पांझरा नदी ही धुळे जिल्ह्याची जीवन वाहिनी असून या नदीचा उगम पिंपळनेर जवळील ‘शेंदवड भवानी’ च्या डोंगरातून, तर संगम हा बेटावर येथील तापी नदीला. ही पांझरा नदी मिळते.पांझरा व तापीच्या संगमावर महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या संगमावर पौराणिक दगडी शिवालय असून शिल्पकलेचा  पाण्यातील संगमाचा उत्कृष्ट नमुना आहे.पांझरा नदी च्या उपनद्या कान, जामखेली असून ही नदी पिंपळनेर, साक्री, धुळे ,शिंदखेडा येथून जात असून. तब्बल शेकडो गावातून या नदीचा प्रवाह वाहतो व हा सगळा प्रवास 160 की. मी. होतो.पांझरा नदी ही तापीची उपनदी असून पांझरा च्या उपनद्या दोन आहेत. (कान ,जामखेली) पांझरा नदी ही शेंदवड भवानी च्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या कुशीतील ‘गालण्याच्या’ डोंगरातून उगम झाला असून पहिले मोठे शहर पिंपळनेर असून यातूनच ही नदी अतिक्रमणाच्या विळख्यात वेढली गेली आहे. यापेक्षा भयानक पांझरा नदीची दुरावस्था धुळे शहरात झालेली  आहे. या नदीचा 160 किमी प्रवास पूर्व वाहिनी नदी धुळे शहरापासून 8 किमी अंतर वाहत गेल्यावर तिच्या मार्गात येणारा.  भीतीत्रस्तर फोडून ती एका अरुंद दरीतून वळसा घेत. नंतर थाळनेर या गावापासून सुमारे 8 किमी अंतरावर ‘मुडावाद’ येथे तापी नदीला मिळते. पांझरा नदीवरील पिंपळनेर जवळील ‘पांझरा मध्यम प्रकल्प’ असून यामध्ये 1500 MCFT पाणी साठा क्षमता आहे तर 1280 उपयुक्त जलसाठा आहे. 275 MCFT मृतसाठा आहे. तसेच दुसरा धुळे जिल्ह्याला सिंचन व पिण्यासाठी व जिल्ह्यासाठी वरदान ठरलेला ‘अक्कलपाडा’ 22000 MCFT क्षमतेचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे जिल्ह्याचे रोजगार सिंचन, शेती ,उद्योग याच नदीवर अवलंबून आहेत.  त्यामुळे या नदीला अतिक्रमण विळख्यातून मोकळा श्वास करण्यासाठी शासनस्तरावर त्वरित कार्यवाही व्हावी या कामी पांझरा काठ बचाव समिती विविध उपक्रमाद्वारे अभियान राबवित असते.       

महाराष्ट्रात मोठ्या भूभागासह देशात अनेक ठिकाणी व धुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळाच्या स्वरूप आहे त्याचे प्रमुख कारण कमी पडलेला पाऊस. हे प्रथमदर्शी आपणास जाणवते या दुष्काळाची व कमी पावसाची अनेक कारणे आहेत.       नदी नाल्यांचा झपाटाने होणारा ऱ्हास हे मोठे आव्हान आज असुन समाजासमोर उभे आहे. नदी ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून याच नद्यांवर अतिक्रमणे होत आहे.व ही एक नदी प्रवाहातील मुख्य समस्या बनून राहिली आहे. यासाठी शासन स्तरावर व सामाजिक स्तरावर मोठी जनजागृती होणे गरजेचे आहे याच साठी पांझरा काठ बचाव समिती 2015 पासून अविरतपणे संघर्ष करीत आहे. ही समिती विविध उपक्रम राबवून समाज जागृती करीत आहे.व शासन स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात  पांझरा नदी वाचवण्यासाठी जिग्रीचा लढा एकाकीपणे लढत आहे.पावसाळा हा सगळ्या जलस्रोताचे पुनर्जीवन करून घेण्याचा आदर्श कालखंड आहे. नद्यांचा पाण्याची प्रत (शुद्धता)ही पावसाळ्यात सुधारते व याच काळात पावसाच्या पाण्याचे संरक्षण व संवर्धन विचार माणसाच्या मनात व्हायला हवा. वास्तविक नदी-नाल्यांचे पुनर्निर्माण याकडे आपण लक्ष देत नाही. त्यासाठी नदी मार्गातील अडथळे दूर करणे (अतिक्रमण) गरजेचे आहे.असे शासनाला व समाजाला त्याची गरज वाटत नाही. या उलट नदीमध्ये गाळ कचरा पक्की बांधकामे वाढतच आहे. या निष्काळजीपणामुळे व अनास्थामुळे नदी नाल्यांची पुनर्निर्मितीचा अभाव आहे.नदीपात्रात येणारा गाळ त्याचे बदलते प्रमाण नद्यांचा बदलता वेळ पाणी साठवण्याचे ठिकाण पूरप्रणव जागा किनाऱ्यावरची ढासळणारी ,जागा नदीतील वनस्पती त्यांची वाढ, याबाबत  कोणतीही काळजी घेणारी यंत्रणा घेत नाही त्याच मुळे नदीनाल्यांचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे.नदी-नाल्यांना झपाट्याने होणारा र्हास आज हे मोठे आव्हान बनले आहे. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर भविष्यात जीवनदायिनी नद्या मृतप्राय व्हायला वेळ लागणार नाही.  या नद्यांची पुनर्निर्माण  भविष्यात ही कठीण होऊन बसेल.प्रत्येक नदीचे एक बंदिस्त असे खोरे असते. या खोऱ्यात मुख्य नदी व तिच्या अनेक उपनद्या यांचे जाळे असते नैसर्गिक जलोत्सरणाचा परिणाम कारक ठरत असतो. नद्या, उपनद्या यांच्या या जाळ्यातील प्रत्येक उपनदी ही त्या खोऱ्यातून होणाऱ्या जलत्सारणातील अवश्य अशी शृंखला असे नाले-ओढे अशा खोऱ्यातील हे प्रवाह ओळखले जातात तरी प्रत्येकाचे  विशिष्ट स्थान असते. त्यामुळे नदीखोऱ्यातील र्हास पाहणाऱ्या सर्वजण प्रवाहांचे पुनर्निर्माण होणे गरजेचे असते खोऱ्याच्या विकास ही नैसर्गिक विकास प्रक्रिया आहे. ती त्या प्रदेशाच्या उंच संकल्पनांनुसार पडणाऱ्या पावसाचे प्रवाहमार्ग तयार होतात. त्या मार्गाचे जलविभाजक त्यामुळे दोन नद्या खोल्यांकडे जाणाऱ्या पाण्याचे विभाजन होत असते. शासनाकडे या जलस्त्रोत विषयी विश्वासहार्य माहिती उपलब्ध नाही. किती नद्या,नाले, मोठे झाले, छोटे झाले भूजल पातळी माहिती आढळून येत नाही.     

 पांझरा नदी सह इतर नद्या पुनर्निर्माण प्रकारात नदीपात्रात अतिक्रमण मुक्त करणे व लाल (रेड) पिवळी (येल्लो) हिरवी (ग्रीन) या पूररेषा नियंत्रणाचे आखणी करणे यामुळे पाण्याची प्रत चांगली राहील. यासाठी तापी विकास महामंडळाने झालेल्या सर्वेचे त्वरित अंमलबजावणी करावी असे आवाहन शासनाला आम्ही करीत आहोत. व शासनाला देणे आवश्यक आहे. कारण पांझरा नदी उगम पासून ते संगमापर्यंत अखेरचा श्वास घेत आहे. यासाठी या नदीवर पुररेषा नियंत्रणाचे काम तातडीने करून अतिक्रमणधारकांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे.पांझरेच्या उगमापासून संगमापर्यंत या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे महाराष्ट्र हा सर्वाधिक धरणे असणारे राज्य ओळखले जाते. आपल्या राज्यात सिंचनाचे केवळ 18% पेक्षा कमी असून पुढील भागात  दुष्काळाच्या तीव्र पाणी टंचाईचे चटके भासत आहे. आज आपण 21 व्या शतकाकडे व विश्वगुरू कडे वाटचाल करीत असताना पाणीवापर पारंपारिक जून्या शतकातच वावरत आहोत. त्याच मुळे दुष्काळा उग्र स्वरूप धारण करीत आहे. यासाठी समाजाची व शासन जागृत होणे आवश्यक आहे.पाण्याचा शोध कोणी कधी किती जुना आटे ही सज्ञा ख्रिस्तपुर्व 500 मध्ये हिप्पॉक्रेट्सने पाण्याची नैसर्गिक प्रक्रियेचा शोध लावला.यावर्षी पाण्याने ओढ दिल्याने धरणे जलाशय विहिरी आटली आहेत आणि पाण्याची टँकरची वाट पाहण्याची वेळ आपल्यावर आली. आपल्याला लागणाऱ्या पाण्याचे स्त्रोत म्हणजे पावसाचे पाणी तोच पाऊस सर्वसाधारणपणे कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी खालावली असून एक मोठे कारण म्हणजे पाण्याचे विषमतेचे वाटप. आणि टंचाईची कारणे देखील तशीच आहे. लोकसंख्या पूर्वीपेक्षा चौपटीने वाढली त्यामुळे पाण्याची दरडोई उपलब्धता कमी झाली व दुसरे कारण म्हणजे पिण्याचे व शेतीसाठी त्याचे शासनस्तरावर सुयोग्य नियोजन नाही शेतीसाठी व प्रामुख्याने ऊस लागवडीसाठी भूगर्भातील पाण्याचा अमर्याद उपसा उपलब्ध एकूण पाण्याच्या साठ्यातील 89 टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते 6 % पाणी उद्योगासाठी उर्वरित पाणी 5% पाणी घरगुती वापरासाठी वापरले जाते ही मोठी तफावत लक्षात घेता पाण्याचे नियोजन गांभीर्याने केले पाहिजे. व शेतीसाठी ,उद्योगासाठी पाण्याच्या नियोजनाबाबत शासनाने पुन्हा शासनस्तरावर पीक रचना फळभाज्या ऊस मका कडधान्य यासारख्या विविध पद्धतीच्या कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.  त्याशिवाय लोकांचे जीवन सुख समृद्धी होऊ शकत नाही.पाणी हे जीवन आहे पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला गरजेनुसार पाणी लागते. पृथ्वी हा जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे व त्यावर सजीव प्राणी सृष्टी जगत असते.           

आपला मोतीलाल पोतदार 

अध्यक्ष पांझरा काठ बचाव समिती (9405814662)

 भाजपा धुळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख

अक्कलपाडा धरणावरील पथदर्शीचा वास्तव लेख..


अक्कलपाडा धरण पूर्ण भरावयाचे नव्हते तर बांधलेच कशाला ?
         धुळे, जिल्ह्यातील पांझरा नदीवरील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्य अक्कलपाडा अर्थात निम्न पांझरा प्रकल्प तब्बल तीस वर्षांच्या प्रदीर्घ व तीव्र संघर्षानंतर पूर्णत्वास आला . मात्र एवढ्या संघर्ष व पाठपुराव्यानंतर पूर्ण झालेल्या या प्रकल्पाचा अजुनही शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने लाभ होत नाही . दरवर्षी अवघ्या पन्नास टक्के क्षमतेनेच हा प्रकल्प भरला जातो . या अक्कलपाडा धरणाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट पाणी गेल्या वर्षी पांझरेतून असेच वाहून गेले . या वर्षीही या अक्कलपाडाच्या पूर्ण क्षमतेइतके अजून एक धरण भरू शकले असते इतके पाणी पांझरेतून वाहून वाया गेले आहे . हे प्रचंड राष्ट्रीय नुकसान आहे . एकिकडे कोरडवाहू शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे अनेक टीएमसी पाणी असेच वाहून जावून फुकट गुजरातला मिळत आहे . तापीतूनही महाराष्ट्र , खान्देशच्या वाट्याचे प्रचंड पाणी असेच गुजरातला मिळत आहे . 

तीस वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर पूर्ण झालेल्या अक्कलपाडा धरणात पूर्ण क्षमतेने पाणी न भरण्यामागे जे कारण समोर आले आहे ते मोठे वेगळे कारण आहे . धरण पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले तर धरणाच्या बुडित  क्षेत्रात   आधी जेवढ्या जमिनीचे भुसंपादन झाले आहे , त्यापेक्षा १९८ हेक्टर जमिनीचे अतिरिक्त क्षेत्र बुडितात येत असल्याची बाब समोर आली आहे . धरणाच्या मुळ आराखड्यातील ही घोडचूक आहे.  आजच्या भुसंपादन अवार्ड प्रमाणे हे सर्व जादाचे क्षेत्र संपादित करावयाचे म्हटले, तर अजून शंभर कोटींच्यावर खर्च राज्य शासनास करावा लागणार आहे . हे जादाचे क्षेत्र संपादित करण्यासाठी मंत्रालय पातळीवर फारशी सकारात्मक हलचल दिसत नाही . याचे कारण या जादाच्या बुडित क्षेत्राबाबत काही वाद नव्याने समोर आले आहेत . काही मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे भुसंपादनाच्या नव्या कायद्याप्रमाणे जमिनीची भरपूर किंमत , फळझाडे , विहिर , शेड , बागायती वगैरे वगैरे मापदंड लावून प्रचंड मोबदला घेता येतो . अक्कलपाडा धरणात अतिरिक्त क्षेत्र बुडितात येवू शकते, ही बाब लक्षात आल्यावर येथे अनेक भुमाफिया घुसले . हायवे चौपदरीकरण , डायव्हर्शन, सुलवाडे जामफळ योजना अशा भुसंपादनात  जमिनी जाण्याच्या शक्यतेच्या ठिकाणी या भुमाफियांनी स्वस्तात जमिनींचे सौदे केले , आंध्रातून तयार मोठमोठी फळझाडांची रोपे आणून रात्रीतून लावली.

प्रशासकीय यंत्रणेशी संगनमत करून अक्षरशः कोट्यवधि  रुपये कमावले . हेच भुमाफिया अक्कलपाडा वाढीव बुडित क्षेत्रात कार्यरत झाले आहेत . येथेही बाहेरून फळझाडे आणून लावणे व अन्य प्रकार झाले आहेत . काहींचा अजून आरोप आहे, की टेकड्यांमुळे जी जमिन बुडितात जात नव्हती, त्या जामिनीस देखील जेसीबीने चाऱ्या खणून बुडितात दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. अर्थात हा सर्व चौकशीचा भाग आहे. त्यामुळे अतिरिक्त भुसंपादन नुकसान भरपाईचा आकडा प्रचंड वाढून गेला आहे . असे काही जणांचे म्हणणे आहे . प्रशासकीय पातळीवरही तसे अहवाल गेले आहेत . त्यामुळे मंत्रालय स्तरावर असे मत तयार झाले आहे, की  अतिरिक्त बुडित क्षेत्रात फळबागायत करणाऱ्यांना पुढील काही वर्षे फळबागायतचे उत्पन्न घेवू द्यावे . अक्कलपाडात येणाऱ्या पाण्यापैकी अधिकृत बुडित क्षेत्राच्या क्षमतेइतके म्हणजे जवळपास पन्नास टक्के इतकेच पाणी धरणात भरावे . पावसाळ्यातच अतिरिक्त पाणी डावा , उजवा कालव्याद्वारे सोडून नकाणे , चौगाव , गोंदूर व अन्य तलाव भरून घ्यावे . या भुमिकेमुळे अतिरिक्त जमिनीचे भुसंपादन होत नाही व धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही . शेतकरी , नागरिकांच्या डोळ्यादेखत प्रचंड पाणी वाहून वाया जात आहे . हे भुसंपादन व्हावे , धरण पूर्ण क्षमतेने भरावे यासाठी शेतकरी आंदोलनही करीत आहेत . या पार्श्वभूमीवर वस्तुनिष्ठ विचार केला पाहिजे . या सर्वच्या सर्व १९८ हेक्टर जमिन मालकांना एका मापात तोलणे योग्य होणार नाही . ज्यांनी भुमाफियांशी सौदे केलेले नाहित , ज्यांनी आंध्रातून मोठमोठी फळ झाड रोपे आणून रात्रीतून उभी केलेली नाहित ,  ज्यांनी आताच बागायत दाखविलेली नाही , ज्यांनी जेसीबीने टेकड्या तोडून जमिन बुडितात आणली नाही , असे जेवढे जेन्युइन भुधारक असतील त्यांची वेगळी यादी बनविता येवू शकते . उर्वरित भुधारकांची फळझाडांची चौकशी गुगल अर्थ वरुन मागील पाच सात वर्षाची छायाचित्रे काढली तर लगेच लक्षात येवू शकते . कोणी केव्हा रोपे लावली ते समजू शकते . सुलवाडे जामफळ प्रकल्पात या प्रकारे गुगल अर्थवरून काढलेल्या फोटोत तर मोठमोठ्या रोपांनी भरलेले ट्रक , रोपे उतरविणारे मजुर , रोपांचे खड्डे करणारे जेसीबी सारे उघड झाले होते .

अक्कलपाडा वाढीव बुडित क्षेत्रातही असा शोध घेता येवू शकतो . तशी काही चलाखी कुठे आढळळीच, तर तेवढा क्लेम वजा करून बाकी रकम अदा करता येवू शकते . भुमाफियांनी अलिकडे सौदे , खरेदी केलेली असली, तरी मुळ सरकारी किमती व्यतिरिक्त जादाची तीन पटची रक्कम व इतर रकमा जमिनीच्या मुळ मालकास देण्याची तरतुद करता येवू शकते . सरसकटच सर्व भुधारकांना एका पारड्यात तोलणे योग्य नाही . इतके प्रचंड पाणी दरवर्षी वाया जाते. त्याची किंमत शंभर कोटींच्याही वर आहे . त्यासाठी वस्तुनिष्ठ विचार करून अतिरिक्त जमिनीचे संपादन झाले पाहिजे व अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला गेला पाहिजे . अक्कलपाडा धरणाचा प्रस्ताव आला तेव्हा अभियंत्यानी प्रारंभी ही साईट फिजिबल नाही . हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याइतके पाणी कॅचमेंट एरियात नाही . धरण पूर्ण भरू शकणार नाही . अशी नकारघंटा वाजविली होती . पण प्रचंड अडथळे पार करीत करीत तब्बल तीस वर्षात हे धरण पूर्ण झाले . शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी घास आला, तर पुन्हा ही वाढीव बुडित क्षेत्राची नवी समस्या उभी राहिली . यातून त्वरित मार्ग काढला पाहिजे.(साभार .- दै पथदर्शि अग्रलेख. दि.19/9/2020)

पांझरा नदी वरील …..”लाटीपाडा धरण”…..***धरणाची लाबी. 1144 मिटर***सांडव्याची लांबी.880 मिटर***धरण्याच्या मंथ्याची उची.549.50 मिटर***धरणाची पुर पातळी.547.50 मिटर.***धरणा उंची.31.10 मिटर***या धरणाला डावा कालवा,व उजवा कालवा आहे.***पाणी साठवण क्षमता.1258 क्युसेस***धरण पुर्ण बांधून सन 1972 साली झाले.

धुळे जिल्ह्याला सिंचन व पिण्यासाठी व जिल्ह्यासाठी वरदान ठरलेला ‘अक्कलपाडा’ 22000 MCFT क्षमतेचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे जिल्ह्याचे रोजगार सिंचन, शेती ,उद्योग याच नदीवर अवलंबून आहेत.

साक्रि तालूक्यातील जामखेडी प्रकल्प “डँक बिक ” हा सांडवा “बदकाची चोच”च्या आकाराचा आहे. एक मेव महाराष्ट्रातील सांडवा..

पांझरेचे ऊगम स्थान शेंदवड भवानी डोंगर व मंदीर..

पांझरा नदी विषयी सुरेख अनुभव डॉ. सुधीर कुळकर्णी

पांझरा नदी विषयी सुरेख अनुभव डॉ सुधीरजीनी …मांडला आहे हे वास्तव भनाला भावल……
मोतीलाल पोतदार…..
अध्यक्ष – पांझरा काठ बचाव समिती…….!!
भारतीय नद्या. कथा आणि व्यथा.
पांझरा.
…..डॉ. सुधीर कुळकर्णी.
माझे जन्मगाव धुळे. धुळ्याची नदी, फपांझरा! तिच्याच पाण्यावर माझा पिंड पोसला गेला. खरे तर ती “भारतीय” म्हणण्याएवढी मोठी नाही. परंतु माझ्या जीवनातील तिचे स्थान, “व. पु. काळे” यांनी म्हटल्याप्रमाणे, ” हिच माझी वहिदा”! वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत म्हणजे, दिसलेली, भेटलेली प्रत्येक “गर्दभी”, ” अप्सरा” वाटण्याच्या वयापर्यंत मी तिच्या काठीच रमलो. तिच्या पाण्याच्या संस्कारांमुळे उत्तर आयुष्यात खर्‍या परीमध्ये रमलो.
असो.
पांझरा, तापीची उपनदी. सर्वत्र तिचा उल्लेख असाच असतो. पण तिलाही स्वतंत्र अस्तित्व आहे. ती साध्यासुध्या भागातील साधीसुधी नदी आहे. अगदी गावंढळ नाही म्हणता येणार पण, खेडवळ आहे. वावरात कष्टणारी, गुरेढोरे, आपले “अंडेर अंडोरनी, (अहिराणीभाषेतील शब्द. मुलगा मुलगी यांची आई) काळजी घेणारी माडी, घरधन्याला सूर्य डोक्यावर आल्यावर झुणका भाकर घेऊन त्याच्या “संगट” बांधावर निंबाच्या झाडाखाली खायला बसणारी खानदेशी माय!
तिचा जन्म ना मोठ्या पर्वतराजीतील ना कुठल्या देवाच्या कृपेने!
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरजवळील, धानोरा व गाळण या डोंगरातून दोन छोट्या धारा सुरू होतात. थोडावेळ स्वतंत्र वाहत जावून एकत्र येतात. झाडाच्या मोठ्या पानांवरून ओघळ खाली पाझरावे तशी तशी ती पाझरते म्हणून “पान झरा.. पांझरा!”
उगमापाशीच छोटे नागेश्वराचे मंदिर आहे. महादेवाच्या पाया पडून ती पुढे वाहू लागते. आधीच जीव छोटा. त्यात तिला काही कळण्याच्या आत, लगेच “लाटीपाड्याला” तिच्यावर बांध घातला गेला. त्यातून कशीबशी सुटका करून ती प्रवास चालू ठेवते. पिंपळनेरला येते. येथे मिळालेल्या चौथ्या शतकातील ताम्रपटामुळे पांझरेचे ऐतिहासिक अस्तित्व विशद होते. जैन धर्मीय पार्श्वनाथ तिला येथे भेटायला येतात. प्रवासही थोडा खडतर होतो. परत नशिब दगा देते. कुसुंबा-साक्रीजवळ “अक्कलपाड्याला” तिच्यावर धरण बांधले जाते. त्या भागात शेती सिंचनाची सोय होते. भात पिकतो. आताशी ऊसही लावला जातो. पण पुढे ती रोडावते. काठची शेती व माणसे तहानलेलेच राहतात. कोरडवाहू नाचणी, नागली, ज्वारी आदि पावसाच्या भरवशावर पिकत राहतात किंवा करपत राहतात. पांझरा तटस्थपणे दुष्काळ बघत वाहत राहते.
तिचे पाण्यावर वाढलेल्या झालेल्या निजामपूरच्या ह भ प मुरलीधरबुवा उपासनींनी राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्याती मिळविली.
तशीच ती मोराणेला येते. काठावरच्या तिच्यासारख्याच साध्या देवळात राहणार्‍या देवांना नमस्कार करून नकाण्याला येते. पिंपळनेरनंतर रोड झालेली पांझरा येथे प्रकृतीने थोडी भरते. नकाणे गावाच्या विरूद्ध काठाला नकाणे तलाव आहे. लहानपणी शाळेत असताना तेथे आमची सहल जायची. दोन्हा बाजूला शेती व झाडे असलेल्या वीस फुटी रस्त्यावरून कलकलाट करत, एकमेकांचा हात धरण्यापेक्षा, सोडत ओढत, “मास्तरांची” नजर चुकवून, खाण्याचा डबा एका हातात धरून दूसर्‍या हाताने, बाजूच्या चिंचेच्या झाडावर दगड मारत, मध्येच शू करत जायचो आणि यायचो. इतका सुखद, मोकळा ढोकळा प्रवास नंतर आयुष्यात कधी झाला नाही. मागच्याच डिसेंबर २०१९ ला आम्ही तेथे परत गेलो होतो. आता रस्ता ” “महामार्ग” झालाय. चिंचेच्या झाडांचा मागमूसही नाही. रहदारी इतकी वाढली की मोठ्यांनाही पायी जाणे धाडसाचेच ठरेल.
असो.
नकाण्यानंतर ती येते धुळ्याला! हे तिचे आवडते शहर. विश्वेशरैय्यांनी रचना केलेले. ” वक्रनलिका” तत्वावर पांझरेचे पाणी पाटाद्वारे धुळे शहराच्या मधून नेत माळ्याचे मळे पिकविणारा पाट हे पांझरेचे वैशिष्ट्य. गरूड बागेजवळून हा पाट वाहतांना त्यात कैर्‍या पडत. त्या पकडण्यासाठी धुणे धुवायला आलेल्या बायकापोरींची धांदल उडायची.
शहरात प्रवेश करतांना उजव्या हाताला गणपतीचे मंदिर, पांझरा वॉटर वर्क लागते. तेथे तिच्या पात्रात सात मोठ्या विहिरी खणल्या होत्या. तेथून ती धुळेकरांची तहान भागवायची. तशीच ती वाहत जाताना, ‌कालीकामाता, शंकर यांना नमस्कार करून पुढे यायची.
तिच्या डाव्या तिरावर छोटेखानी देवपूर आहे. तेथे आम्ही राहायचो. उजव्या बाजूला तिच्या काठाला सुरेख घाट होता. छोट्या गोल घुमटासारख्या “छत्र्या होत्या. मागे मशिदीतून बांग यायची. विजय ठरण तलाव ओलांडून ती “समाधीजवळ” यायची. ती कुणाची समाधी हा प्रश्न आम्हाला तेव्हा वा नंतरही कधी पडला नाही. कडेला बालविकास मंदिर होते. तेथे माझे दुसरीपर्यंत शिक्षण झाले. समाधीला लागूनच तिच्यावर ” मोठा पूल” आहे. येथे नदी पार करायला सोपे जायचे. चौथीपर्यंत,, आई माझा हात धरून शाळेत पोहोचवायची. ती शिक्षिका असलेली शाळा जवळच होती. येतांना मला घेऊन यायची.
पुलाच्या पायथ्याशी, “आसरा” देवतांनी आसरा घेतला होता. पावसाळ्यात तेथे एकदा श्रीफळ व फुले वाहिली की ती तिच्या पाण्यात कुणाचा “बळी” घेत नसे अशी श्रद्धा आहे. लगेच एक “घाणा” होता. शेंगदाणे, सरकी घेऊन जायचे ताजे तेल घेऊन यायचे. येतांना पिशवीत आठवणीने “पेंड” घ्यायची. घरी आईजवळ द्यायची. ही “आमच्याच बापाची पेंड” बरेच वर्षे आम्ही खाल्ली.
धुळ्याच्याच शंकर देवांनी पांझरेच्या आशीर्वादाच्या बळावर, समर्थांच्या शिवथर घळीचा शोध घेतला. इतिहासाचार्य राजवाड्यांनी तिच्या काठालाच कर्मभूमी मानले. नवग्रहांनाही येथे वसती कराविशी वाटली.
पूल ओलांडल्यावर डाव्या काठावर “पंचवटी” मंदिर लागायचे. तेथील देवतांना नमन करून ती “एकवीरेपाशी” यायची. तेव्हा देऊळ म्हणजे छोटी गढीच होती. अनेकांची ही कुलदेवता असल्याने कायम गर्दी. संध्याकाळी देवळाच्या बुरुजावर बसून मावळत्या सूर्याला निरोप देणे हा वेगळाच अनुभव होता. तसेच नवरात्रात दाटीवाटीने अंधार्‍या गुहेतून गाभार्‍यात जायचे यायचे दीव्य एकवीरा व पांझरा यांच्या संयुक्त आशीर्वादाने पार पडायचे.
मंदिराच्या बाजुलाचा अमरधाम होते. तेथे जायची आम्हाला बंदी होती. पण त्या बाजूच्या तटबंदीवर चढून “जळणारे काहीतरी” बघणे हा सुद्धा एक अनुभवच असायचा.
असो.
देवीच्या समोरील वाळवंटात देवीची यात्रा ही आम्हाला पर्वणी होती. पिंगाणी घेऊन, गाठीशेव खात ” “मौतका कुआ” बघणे, उंच पाळण्यात बसणे, “पेटीतला शिणीमा” बघणे व शेवटी डांगर टरबूज खाऊन घरी येणे. हा यात्रेचा कार्यक्रम कधी चुकायचा नाही. तिच्या वाळवंटात नंतर वर्षभर आम्ही रमायचो नाही.
एक वळण घेऊन पांझरा ईशान्येकडे वळते. येथे तिला मोठ्या दगडी घळी आहेत. त्यातल्याच एकाला “हत्ती डोह” म्हणतात. त्यापुढील वाळवंटात, अधिकृत कराराने, आमचे वडील डांगर टरबूज, खरबूज पिकवायचे. कष्टाचे चीज म्हणून पांझराही त्या फळांचा आकार घागरीएवढा, अंतरंग लाल व चव गोड करायची.
नंतर शांतपणे वाहत ती वरखेडे, न्याहळोदला येते. वरखेड्याला तिच्या काठी, छोटे स्वामी नारायण मंदिर आहे. तेथून पुढे शिरढाणेजवळ एका बंधार्‍याने ती बांधली जाते. तिचे सिंचनाचे कर्तव्य पार पाडत कौठळ, मांडळ, बेटावद ओलांडून मुडावदजवळ येते.
आता तिला आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्यासारखे वाटते.
साधेसुधे पण तृप्त जीवन दिले याबद्दल “कपिलेश्वराप्रति” कृतज्ञ होत तापीमध्ये अहेवपणे विलीन होते. ते पाहून खुद्द कपिलेश्वरही ” पुण्यश्लोक अहिल्यादेवीने संगमास्थानी बांधलेल्या सुबक मंदिरात राहायला येतात.
त्या परिसरात आपणही शांत होतो. पवित्र जलाचे अर्घ्य देवाला अर्पण करताना त्या तीर्थस्थानी मीही तिला वचन देतो…. माझ्या देहाची चिमूटभर राख तुझ्यातच विसर्जित होईल!!!
अकरावीनंतर मी पांझरेला एका दृष्टीने अखेरचा दंडवत केला.
देवपूरला नदीकाठीच माझ्या बहिणी राहायच्या. आता भाचरे आहेत. प्रेमाचे मायेचे धागे अजून घट्ट आहेत. मधून मधून धुळ्याला जाणे होते.
आता नदी कुणी “पार” करत नाही. बरेच पूल झाले आहेत. पण खाली पाणीच नसते. शेवाळं, पाणवनस्पती, सर्व प्रकारचा कचरा मात्र भरपूर असतो. पावसाळ्यानंतर पांझरा सलाइन दिल्यासारखी थोडी तुडतुडीत होते. स्वतःलाच स्वच्छ करायचा प्रयत्न करते. दोनचार बगळे मिळेल त्यावर गुजराण करतात. छत्र्या मोडल्यात. एकवीरा आता राजवाड्यात राहते. पाट सपाट झालाय. काठाशी लगटून व खुद्द पात्रात बांधकामे झाली आहेत. वाळूसाठी तिला खरवडून काढताहेत. पात्रातील विहिरी नामशेष झाल्या आहेत.. हत्तीडोह शोधावा लागतो…..
….. नाही म्हणायला गणपती मंदिरासमोर, शिवशंकराचे एक शिल्प ऐन मध्यभागी तिच्या पात्रात आकाराला येते आहे.दोनही किनार्‍याची “चौपाटी” करायचा “घाट” घातला जातोय.
सकाळी सकाळीच झुंजुमुंजू समयी गणपती मंदिरासमोरील पुलावर, मी तिच्याशी न बोलता तासभर बसतो. तेवढ्या अवधीतही ती बरेच काही सांगून जाते. या ह्रदयाचे त्या ह्रदयी जाते.
उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून मी तिचा निरोप घेतो. दूर कुठेतरी , आठ नऊ वर्षाचा एक मुलगा, आईचा हात धरुन नदी पार करताना दिसतो. पांझराही त्यांना सांभाळून पलिकडे नेते आणते.
मी खाली नदीकडे बघतो. माझे लहानपण निगुतीने जपत पांझरा शांतपणे वाहत असते.
या साध्यासुध्या मनी मायला माझा
नमस्कार..
….डॉ. सुधीर कुळकर्णी.

छायाचित्र

दैनिक पोलीस शोध

संपादकीय

नद्यांचे पुनरूज्जीवन
होऊ शकते का?

देशातील सर्व नद्या हृदयरोगाने आजारी असून त्यांच्यावर त्याप्रमाणेच उपचारांची गरज आहे. पण असे असतांनाही सध्या नद्यांवर ‘ब्यूटीपार्लर’ किंवा ‘दंत वैद्यकीय’ पध्दतीने केवळ सौंदर्य वाढविणारे उपचार केले जात आहेत. नद्यांना पुनरूज्जीवित करण्यासाठी ‘ठोस पावले’ उचलणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत जलतज्ञ डॉ. राजेन्द्रसिंह यांनी व्यक्त केले आहे.

मानवी गरजांना आवश्यक असेल तेव्हढे देण्यासाठी निसर्गाची संपूर्णत: तयारी असते. परंतू आम्ही निसर्गातील घटकांना ओरबाडतो आहोत असे मत महात्मा गांधी यांनी व्यक्त केले होते. या राज्यातील जंगले, पर्वत रांगा मानवाने उध्वस्त करून ठेवल्या आहेत. सातपुडा बोडका झाला आहे. नद्यांवर धरणे बांधून आम्ही आमच्या पिण्याच्या पाण्याची आणि उद्योगांना लागणार्‍या पाण्याची व्यवस्था केली आहे. रस्त्यांचे रूंदीकरण, चौपदरीकरण, सहा-आठ पदरी समृध्दी महामार्ग, मेट्रो-बुलेट ट्रेनसारख्या विकासाच्या योजना सरकार राबवते आहे. परंतू निसर्गाचा ‘समतोल’ आणि ‘नैसर्गिक समृध्दी’ खर्‍या अर्थाने ज्या वाहत्या नद्यांवर अवलंबून आहेत त्या नद्यांबद्दल मात्र शासन-प्रशासन स्तरावर प्रचंड ‘उदासिनता’ आहे. दिल्ली-मुंबई नंतर आता पूणेकर नागरिकांचा ‘श्वास’ दुषित हवेमुळे गुदमरायला लागला आहे. परंतू भौतिक विकासाच्या ‘धुंदीत’ आमचा श्वास ‘स्वस्त’ झाला आहे. जलपुरूष डॉ. राजेन्द्रसिंह यांनी आपलं संपूर्ण जीवन नद्यांच्या पुनर्रज्जीवनासाठी, बारमाही नद्या करण्यासाठी आणि नदीजोड प्रकल्पांसाठी समर्पित केलेले आहे. परंतू त्यांची व्याख्याने आयोजित करून केवळ ऐकली जातात, अशी परिस्थिती आहे. सरकारने डॉ. राजेन्द्रसिंह यांच्या विचारांवर खर्‍या अर्थाने ‘गंभीर’ होण्याचा हा काळ आहे. अन्यथा 2050 पर्यंत म्हणजेच येणार्‍या 25 वर्षात कदाचित पाण्यासाठी ‘तिसरे महायुध्द’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे येथे जी-20 परिषदेच्या निमित्ताने सिव्हील-20 गटातील सदस्यांसाठी ‘नद्यांचे पुनर्रज्जीवन आणि पाणी व्यवस्थापन’ या विषयावर दोन दिवसीय जल परिषद संपन्न झाली. यावेळी नदी पुनरूज्जीवनासाठी ‘शाश्वत’ उपाय केल्यास भुजल आणि जमिनीवरील पाण्याच्या र्‍हासासंदर्भात चर्चा करण्यात आली. मरणासन्न नद्या जीवंत करण्यासाठी आणि प्रदुषणात अडकलेल्या नैसर्गिक जलस्त्रोतांना मुक्त करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकजुटीने काम करण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी जलतज्ञ डॉ. राजेन्द्रसिंह लिखित ‘सभ्यता की सुखती सरितांऐ’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. डॉ. राजेन्द्रसिंह यांनी 127 देशांच्या ‘नद्या यात्रा’ करत नद्यांच्या उगम स्थानापासून ते समुद्रातील संगमापर्यंत प्रवास केला आहे. या पुस्तकात भारतातील गंगा, ब्रह्मपुत्रा, शरयु, सिंधु यासारख्या भारतीय नद्यांबरोबरच बेल्जीयम, फ्रान्स, नेदरलॅण्ड आदि देशातील नद्यांचा अभ्यास करून त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. मानवी आरोग्य हे नदीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. जर नद्या आजारी पडल्या तर जीवसृष्टीही आजारी पडेल. जर नद्या ‘सुकल्या’ तर मानवी सभ्यताही ‘ओस’ पडेल असे परखड मत डॉ. राजेन्द्रसिंह यांनी या पुस्तकातून व्यक्त केले आहे. मानवी कल्याणासाठी वाहत्या नद्या या अत्यावश्यक असून केंद्र सरकार किंवा देशातील एकही राज्य सरकार याबाबत फारसे ‘गंभीर’ नाही. परंतू येणार्‍या पिढ्या आम्हाला ‘समृध्द जीवन’ जगणार्‍या बघायच्या असतील तर या देशातील नद्या जीवंत करण्यासाठी नितीन गडकरींसारखा एखादा ‘जिद्दी’ माणूस केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून निवडावा लागेल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाने ‘चला नदीला जाणून घेवू या’ या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे. परंतू यात केवळ 108 नद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘चला नदीला जाणून घेवू या’ यात कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत हे त्या – त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना तरी समजले आहे का? हा खरा प्रश्न आहे. खान्देशाचा विचार केला तर तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तापी, गिरणा, वारणासारख्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. धरणांमधील पाण्याचा साठा हा मानवी गरजांसाठी मोजला जातो. परंतू भूगर्भातील पाणी खोलवर जाते आहे, संपते आहे यावर चिंतन करायला सरकारजवळ आणि नागरिकांजवळही वेळ नाही. म्हणून डॉ. राजेन्द्रसिंह सांगतात त्याप्रमाणे खरोखरच नद्यांचे पुनर्रज्जीवन होईल का? असा प्रश्न आमच्या समाजवादी मित्राला पडला आहे. सरकारने आणि प्रशासनातील ‘जीवंत’ मनाच्या अधिकार्‍यांनी यावर खोलवर ‘चिंतन’ करणे आणि खळखळत्या नद्या खरोखर वाहू शकतात का? यावर ‘प्रयोजन’ करावेत. तूर्तास एव्हढेच …!

दै.पथदर्शी,अग्रलेख

दि. 12/12/2023
सिंचन-उद्योग-विकासाच्या मुद्यावर खान्देशातील पुढाऱ्यांत कुठे आहे एकता?

धुळे जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील खान्देश प्रदेशासाठी एकूणच पाण्याच्या विषया बाबत एकदा एकत्रित चर्चा होणे आवश्यक होते. ते काम परवा धुळ्यात झालेल्या जल परिषदेने केले आहे. उत्तर महाराष्ट्र जल परिषदेने ही चर्चा आयोजित केली होती. या क्षेत्रात वर्षानुवर्ष काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी या परिषदेत उपस्थित राहून आपापल्या भुमिका मांडल्या. उत्तर महाराष्ट्रातील सिंचन वाढवून दुष्काळमुक्तीचा संकल्प करीत, या परिषदेत एकूण नऊ ठराव संमत करण्यात आले. यात तापी वरील अमळनेर जवळचे पाडळसरे धरण पूर्ण करणे. या १९ टीएमसी क्षमतेच्या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करणे.

नार – पार योजने अंतर्गत मांजरपाडा -१ , वांजुळपाणी योजना, नार – पार गिरणा नदी लिंक योजना, हातनुर धरणाचा गाळ काढणे, तेथे डाव्या कालव्याची बांधणी करणे, वरखेड – लोंढे – शेळगाव बॅरेज व सुलवाडे जामफळ चा समावेश बळीराजा संजिवनी प्रकल्पात करणे, सौर उर्जा व पाईप लाईन द्वारा पाणी आणून कायम स्वरूपी पाणी साठे निर्माण करणे, तापी वरील जळगाव जिल्ह्यातील १४ व धुळे नंदुरबार मधील २२ उपसा योजनांना सौर तंत्रज्ञानाचा वापर करून विद्युत पुरवठाची सोय करणे, गिरणेवरील सात बलून बंधारे पूर्ण करणे, तापी – बुराई नदीजोड प्रकल्प पूर्ण करणे, उकाई धरण ते मोसम नदी व उकाई धरण ते पांझरा नदी लिंक प्रकल्पाचे सुक्ष्म सर्व्हेक्षण करणे, आदी ठराव करण्यात आले. या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राच्या खान्देश विभागातील बहुतेक सिंचन विषयावर चर्चा झालेली दिसते. तापी – नर्मदे मधील खान्देशच्या हिश्याचे पाणी देखील आपण वर्षानुवर्षे वापरू शकलेलो नाहित. हे सर्व पाणी वाहून गुजरातला उकाई व सरदार सरोवरच्या माध्यमातून मिळते किंवा अरबी समुद्रात तरी जावून मिळते. तापीवर सुलवाडे – सारंगखेडा – प्रकाशा हे बॅरेजेस झाले परंतु वर्षानुवर्ष त्या पाण्याचा उपयोग होत नाही. आता सुलवाडे – जामफळ – कनोली ही २०० गावांची जमीन भिजविणारी अडिच हजार कोटींची योजना केंद्राकडून खा. सुभाष भामरेंच्या प्रयत्नांनी मंजुर झाली. त्याचे वेगाने काम सुरु आहे. त्याच प्रकारे सुलवाडे बॅरेज ते शिरपूर तालुक्यातील मालकातर व रहाट्यावळ धरणांची कामे पूर्ण करून सुलवाड्यातून त्यात पाणी टाकता येवू शकेल. यासाठी देखील सौर विद्युत प्रकल्प राबविता येवू शकतील. तापीवरील २२ अधिक १४ अशा ३६ उपसा योजनांची दुरुस्ती व कामे करून त्यांच्या विजेसाठी देखील सौर प्रकल्प उभारता येवू शकतो. तापी वरील प्रकाशा बॅरेज ते बुराई नदी उपसा प्रकल्प महत्वाचा आहे. पण त्याचे काम बंद आहे. त्याच्या लाभ क्षेत्रातील आमदार – खासदारांच्या निष्क्रियतेचे ते प्रतिक आहे. त्यामुळे आता नंदुरबार – शिंदखेडा – साकी तालुक्यातील शेतकरी स्वतः पुढे सरसावले आहेत. त्यांची विविध आंदोलने झालीत. आता ते स्वतः नागपूर विधानसभा अधिवेशन काळात तापी – बुराई जलसंघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यासाठी नागपूरला रवाना झाले आहेत. नर्मदेवरील सरदार सरोवर मध्ये खान्देशची ३३ गावे विस्थापित झाली. हजारो एकराचे पिवर सागवानी जंगल पाण्याखाली गेले. या धरणासाठी गुजरात – महाराष्ट्र – मध्य प्रदेश – राजस्थान या चार राज्यांनी करार केला. नर्मदा अवार्ड झाला. हा करार महाराष्ट्रासाठी पूर्णतः आत बट्टयाचा होता . महाराष्ट्राला या धरणात अति – ति तुटपुंजे म्हणजे अवघे १० टीएमसी पाणी मिळाले. धरण पूर्ण होवून कितीतरी वर्षे लोटली. हे तुटपुंजे १० टीएमसी पाणी देखील बॅक वॉटर मधुन खान्देशला मिळत नाही. कारण मध्ये सातपुडा आहे.

बोगदा खणून पाणी आणावे लागणार आहे. खरे म्हणजे या प्रकल्पाच्या करारावर सही करतानाच महाराष्ट्राच्या तेव्हाच्या नेत्यांनी हा बोगदा बनविण्याची जबाबदारी सरदार सरोवर प्रकल्पाचा भाग म्हणून नर्मदा प्राधिकरण वरच टाकायला हवी होती. सरदार सरोवरच्या हजारो कोटींच्या कामात हे काम तेव्हा होवून गेले असते तर आता या बोगद्यातून धडगाव – अक्कलकुवा – तळोदा वगैरे भागात पाणी खेळत राहिले असते. महाराष्ट्राने एवढे मोठे योगदान दिले त्यामानाने हे काम अत्यंत किरकोळ राहिले असते व तेव्हा त्यांना ते मान्य करावे लागले असते. आता देखील नंदुरबार जिल्ह्याच्या नेतृत्वात हा बोगदा करून घेण्याची इच्छाशक्ती व हिंमत नाही. तापी वरून म. प्र. व महाराष्ट्राची पहाड पट्टीची जमीन रिचार्ज करण्याची एक महत्वाकांक्षी योजना आहे. त्याचाही पाठपुरावा झाला पाहिजे. पेठ – सुरगाणा परीसरातील नार – पार – तान – मान – औरंगा – अंबिका अशा १९ हून अधिक मोठ्या व लहान पश्चिम वाहिनी नद्या या सह्यांद्री मधून पश्चिमेला वाहत जावून अरबी समुद्रास जावून मिळतात. या परिसरात पाउसमान अतिवृष्टीचे आहे. हे प्रचंड पाणी वाया जाते. या नार-पार नद्यांचे पाणी अडवून ते कमी पाउस मानाच्या तुटीचे खोरे असणार्‍या गिरणा – पांझरा खोर्‍यात टाकण्याची जुनी मागणी आहे. या पाण्यावर देखील गुजरातचा डोळा आहे. त्यांना हे देखील पाणी गुजरातकडे वळवायचे आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यात ‘ हे पाणी गुजरातला देणार नाही,’ असे म्हणावयाची हिंमत नाही. ही बाब तर वारंवार अधोरेखित झाली आहे. विदर्भ – मराठवाडा विकास महामंडळा प्रमाणे खान्देश आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. अशी जुनी मागणी आहे. असे महामंडळ स्थापन करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. राज्यघटनेत तरतुद करावी लागेल. ही मागणी जुनी आहे. यासाठी खान्देशातील सर्व खासदार एकत्र आले, असे चित्र मात्र गेल्या पाच – पन्नास वर्षात खान्देशाने बघितले नाही. या बाबत लोक प्रतिनिधींमध्ये फारसे गांभिर्य दिसून येत नाही. सिंचन – उद्योग – विकास या मुद्यांवर विदर्भ – मराठवाडा – पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षिय नेत्यांमधील दिसणार्‍या एकते प्रमाणे खान्देशात एकता दिसत नाही, ही खरी शोकांतिका आहे!
(कृपया फॉरवर्ड करा- योगेंद्र जुनागडे, धुळे)

सर्वात उंच शिखर कळसुबाई, नंतर साल्हेर पाठोपाठ "शेंदवड भवानी गढ," समुद्रसपाटीपासून १४३० मीटर उंच. अवघड चढण, रास्ता म्हणजे फक्त पायवा या डोंगराच्या तीन बाजूला तीन जिल्हे आहेत. उत्तरेला धुळे, दक्षिणेकडे नाशिक आणि पश्चिम दिशेला डांग जिल्हा. धुळे जिल्ह्यातली पांझरा, नाशिकची मोसम, आणि गुजरातची पूर्णा नदी याच डोंगरातून उगम पावतात. याच्यास उंच सुळक्यावर स्वयंभू भवानी मातेचे मूर्ती आहे. परिसरातील तिन्ही जिल्ह्यातील लोकांची फार श्रद्धा आहे.

दि. 22/02/2026
‘प्रोजेक्ट अमृत- स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे पांझरा नदी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली

या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन पिंपळनेरच्या नगराध्यक्ष डॉ योगिताताई चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पिंपळनेर येथील प्रख्यात धन्वंतरी डॉ जितेशजी चौरे, एकलव्य स्कूलचे प्राचार्य डॉ देविदास राजगिरे,ज्येष्ठ पत्रकार प्रा. एस डी पाटील, रावसाहेब शिंदे,एन.एफ. सोनवणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सं.नि.मंडळाचे स्थानिक मुखी जगदीश ओझरकर यांनी केले. सूत्रसंचालन सेवादल युनिटचे इंचार्ज गणेश गुरव यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष योगिताताई चौरे यांनी निरंकारी मंडळाच्या जलस्वच्छता अभियानाचे कौतुक करून या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ जितेश चौरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक व निरंकारी भावीक-भक्तांनी यावेळी पांझरा नदीकाठावरील तीन ट्रॉली कचरा,प्लास्टिक पाण्याचे प्रदूषण करणारी घाण साफ केल्याने पांझरा नदीने मोकळा श्वास घेतल्याच्या प्रतिक्रिया पिंपळनेरकर नागरिकांनी व्यक्त केल्या.
पांझरा काठा बचाव समिती कडून सर्वाचे आभार शुभेच्छा